सध्या शेतमजुरीची आणि मशागतीची कामे जोरात सुरू असली तरी कोरोनावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी तसेच मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील नागरिकांनी देखील घरातून बाहेर न निघता एक दिवस काम बंद ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान नाशिक -औरंगाबाद महामार्गासह मानोरी परिसरातील वाहतूक, रहदारीसुद्धा नेहमीपेक्षा अत्यल्प प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे महामार्ग तसेच गाव अंतर्गत रस्ते, गावच्या वेशी सकाळपासूनच नागरिकांअभावी ओस पडल्याचे दिसून आले. शहरी भागात कोरोना सदृश्य रु ग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असताना ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राने खेडोपाडी , गावोगावी एका आरोग्य सेवकाची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जरी कोरोनाचे रु ग्ण आढळले नसले तरी वेळीच प्रशासनाने काळजी घेऊन आरोग्य सेवक नेमावा अशी मागणी केली जात आहे. तसेच खेड्या-पाड्यात कोरोनाची भीती नाही अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत असून अनेक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरिकांचा घोळका दिसून येत आहे. त्यामुळे पोलीसांनी ग्रामीण भागात गस्त घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
मानोरी परिसरातील नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 4:04 PM