सप्तशृंगगड : श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड व नाशिक रनर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २९) नांदुरी ते सप्तशृंगगड अशा सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गटातून सुमारे ५२० महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच परदेशातील आंतरराष्ट्रीय धावपटू पुरुष व महिला व सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रधान जिल्हा न्यायाधीश एम. ढवळे, कळवणच्या न्यायाधीश श्रीमती पैठणकर, सप्तशृंगगड ट्रस्टचे विश्वस्त राजेद्र सूर्यवंशी, जयंत जायभावे, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या काळात सप्तशृंगगडावरील घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.नांदुरी ते सप्तशृंगगड या घाट रस्त्यावर ३ किमी, १० किमी व २१ किमी या तीन विभागामध्ये स्पर्धा भरविण्यात आली. नांदुरी येथून सर्व स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. स्पर्धकांना भगव्या रंगाचे टी शर्ट दिले असल्याने संपूर्ण घाट भगवामय झालेला दिसत होता. २१ किलोमीटरचा घाट व चढण असल्याने स्पर्धकांसाठी ठिकठिकाणी शक्तिवर्धक पेय, केळी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली होती. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी घाटात ढोल पथक ठेवण्यात आले होते. तसेच येथील युवक मोटारसायकल घेऊन घाटात जय अंबे, अंबा माता की जय, अशा घोषणा देत स्पर्धकांचा उत्साह वाढवित होते. तीन किलोमीटरमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. कळवणचे तहसिलदार कैलास चावडे यांनीही तीन कि.मी.मध्ये सहभाग घेतला. यावेळी नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, ट्रस्ट कर्मचारी, ग्रामस्थ आदि उपस्थित होते. (वार्ताहार )
सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
By admin | Published: January 29, 2017 11:32 PM