नाशिक : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांनंतर जबाबदारीतही काही प्रमाणात बदल करण्यात आले असून, पूर्वीच्या उपआयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्याकडील जबाबदारीचे विभाजन करतानाच अतिरिक्त आयुक्त (सेवा) ही जबाबदारी आयुक्तांनी आपल्या शिरावर घेतली आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाच्या विविध खात्यांची फेररचना केली. त्यातील प्रशासन आणि नगररचना ही महत्त्वाची दोन खाती वगळता अन्य सर्व जबाबदारी दोन्ही अतिरिक्त आयुक्तांमध्ये विभागून दिली होती. यात किशोर बोर्डे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (शहर), तर रमेश पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (सेवा) अशी जबाबदारी सोपवत खातेवाटप करण्यात आले होते. रमेश पवार यांची नुकतीच परभणी महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली असून, त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (सेवा) हे पद रिक्त झाले आहे. या पदाच्या सर्व जबाबदाऱ्या मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांच्याकडे दिल्या जाणार असल्याची चर्चा हाती. मात्र सेवा विभाग मुंढे यांनी स्वत:कडे घेतला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, उद्यान, भूमिगत गटार, बांधकाम, पाणीपुरवठा हे सर्व विभाग आता आयुक्तांच्या अखत्यारित असणार आहे. दरम्यान, उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांची बदली झाल्याने त्यांच्याकडील कर व मिळकत या दोन जबाबदाºयांचे विभाजन करून कर विभागाची जबाबदारी नवनियुक्त उपायुक्त महेश डोईफोडे यांच्याकडे, तर मिळकत विभागाचा कार्यभार मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदारीत फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:39 AM