नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त गोदावरी नदीकाठी उभारण्यात आलेल्या घाटांवर अस्वच्छता निर्माण होऊन बकाल स्वरूप येऊ लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने घाट परिसराची दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी मनपाच्या विभागीय कार्यालयांवर सोपविली आहे. मात्र, नदीपात्रातील अस्वच्छतेबाबत आरोग्य विभागाकडून कुचराई केली जात असून अपुऱ्या यंत्रणेकडे बोट दाखविले जात आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यांतर्गत गोदावरी नदीवर ठिकठिकाणी नव्याने घाटांची निर्मिती करण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून टाळकुटेश्वर ते लक्ष्मीनारायण पुलादरम्यान सुमारे ११० कोटी रुपये खर्चून घाटाची उभारणी करण्यात आली तर दसक, टाकळी परिसर, गंगापूररोड परिसर आदि ठिकाणीही घाट बांधण्यात आले. प्रत्यक्ष पर्वणीकाळात सदर घाटांचा फारसा उपयोग झालाच नाही. त्याऐवजी भाविकांनी रामकुंड व गोदाघाट परिसरातच सर्वाधिक गर्दी केल्याचेही दिसून आले होते. दरम्यान, सदर घाटांची पर्वणीकाळानंतर दुरवस्था होणार असल्याचे भाकीत लोकप्रतिनिधींनी वारंवार केले होते. त्याची अनुभूती आता येऊ लागली असून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या घाटांची अस्वच्छता हा महापालिकेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सदर घाटांची दैनंदिन साफसफाई व्हावी आणि त्याठिकाणी भाविकांची वर्दळ दिसावी यासाठी आरोग्य विभागाने आता घाट स्वच्छतेची जबाबदारी त्या-त्या भागातील विभागीय कार्यालयांवर सोपविली आहे. पूर्व परिसरातील घाटांची जबाबदारी पंचवटी विभागीय कार्यालय, पंचवटीतील घाटांची जबाबदारी नाशिक पश्चिमकडे, टाळकुटेश्वर ते लक्ष्मीनारायण पुलापर्यंतची जबाबदारी नाशिक पूर्व आणि दसक-पंचक घाटांची जबाबदारी नाशिकरोड विभागाकडे देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गोदाघाट स्वच्छतेची जबाबदारी मनपाच्या विभागीय कार्यालयांवर
By admin | Published: December 24, 2015 12:27 AM