नाशिक : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता आणखी वाढवून सक्षम होण्याची आवश्यकता असल्याचा सूर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिकमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत उमटला.
मखमलाबाद नाका परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयात रविवारी (दि. १७) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणीची चिंतन बैठक संघटनेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. व्यासपीठावर आमदार नागो गाणार, माजी आमदार बाबासाहेब काळे, भगवानराव साळुंखे, सहराज्यकार्यवाह नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर उपस्थित होते. या वेळी उपस्थित शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी उपस्थित केेलेल्या शंकांचे निरसन करतानाच नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता आणखी वाढवून सक्षम होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याने शिक्षकांनी त्यासाठी सज्ज असावे, असे आवाहनही करण्यात आले. या वेळी राजेंद्र नागरगोजे, सोमनाथ राठोड, उल्हास बडोदकर, गुलाब भामरे यांच्यासह संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे, कार्यवाह शरद निकम, उपाध्यक्ष संजय पवार, संजय सावंत, सचिन मेधने, गोकुळ चव्हाण, राजेश शिंदे, टी.पी. पवार, विनीत पवार आदी उपस्थित होते.