कसबे सुकेणे : आधुनिक काळात सर्व प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागेल. कारण येणारा काळ हा आव्हानांचा व स्पर्धेचा आहे. येऊ घातलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल, अशा प्रकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांना पार पाडावी लागेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.निफाड तालुक्यातील सायखेडा येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व नामकरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पवार यांनी आधुनिक शिक्षण आणि शिक्षणसंस्था यावर अभ्यासपूर्ण विचार मांडत संत गाडगेबाबा यांनी त्याकाळी अशिक्षित समाजाला शिक्षणाची गरज पटवून दिल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा सोनवणे होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते श्री स्वामी षटकोपाचार्यजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असे सायखेडा महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले.प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेचे अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांनी संस्थेच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेने सर्वच क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली असल्याचेही त्या म्हणाल्या. संस्थेतील अनेक विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदावर आहेत. शिक्षणाबरोबरच सामाजिक सेवेचे व्रतही संस्थेने जोपासले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मविप्र संस्थेने १०० वर्षांहून अधिक वाटचाल पूर्ण करताना केवळ जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या विकासाला दिशा दिली. बहुजन समाजाला जगण्याची दृष्टी दिली. या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास घडवून आणला. मविप्र समाज ही सत्यशोधक समाजाचे केंद्र होते असे थोरात म्हणाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे व सभापती नितीन ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, माजी आमदार दिलीप बनकर, माणिकराव बोरस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, संस्थेचे उपसभापती नानाजी दळवी, संचालक मुरलीधर पाटील, डॉ.तुषार शेवाळे, भाऊसाहेब खातळे, कृष्णाजी भगत, रवींद्र देवरे, डॉ. विश्राम निकम, श्रीराम शेटे, अंबादास बनकर, स्वामी कमलाकांत महाराज, प्रल्हाद पाटील कराड, भारती पवार, काशीनाथ टर्ले, सायखेड्याच्या सरपंच सुजाता कातकाडे, बाळासाहेब वाघ, रामचंद्र बापू पाटील, मविप्रचे सर्व संचालक, सभासद, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ.एस. एस. घुमरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अशोक सोनवणे यांनी केले. (वार्ताहर)
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्थांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 10:32 PM