नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने नववर्षदिनी (दि. १ जानेवारी) गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली.पैशाअभावी अनेकजण गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करतात. मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे या विचाराची कास धरूनच आणि गरजू व गरीब रु ग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानेच हे महाआरोग्य शिबिर होत आहे. डॉ. अमित मायदेव, डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. रतन देशपांडे, डॉ. कांतीलाल संचेती, डॉ. सुलतान प्रधान, डॉ. रमाकांत पांडा, डॉ. रणजित जगताप, डॉ. शेखर भोजराज, डॉ. शरद हर्डीकर यांसारखे जागतिक दर्जाचे ७० ते ८० नामांकित डॉक्टर्स रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रि या करणार आहेत. हृदयरोग, किडनीचे आजार मेंदूविकार, कॅन्सर, गर्भाशय, पोटाचे विकार, नेत्ररोग, यांसारख्या आजारांच्या तपासण्यावर वारेमाप खर्च होतो. यासर्व गंभीर व दुर्धर आजारांची तपासणी व शस्त्रक्रि या शिबिरात मोफत केली जाणार आहे. तसेच औषध उपचारांचा कोणताही भार रुग्णांवर पडणार नसल्याने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी हे शिबिर जणू वरदानच ठरणार आहे. वरील आजारांच्या रुग्णांची शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत प्राथमिक तपासणी सुरू असून, ती दि. ३० डिसेंबरपर्यंत चालेल. यानंतर नोंदणी चिठ्ठी देण्यात आलेल्या रुग्णांची रविवार, दि. १ जानेवारीला नामांकित डॉक्टर्सतर्फे शिबिरात तपासणी करून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला देण्यात येईल. गरजू आणि गरीब रुग्णांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहनही आमदार सानप यांनी केले. (प्रतिनिधी)
महाआरोग्य शिबिराच्या नावनोंदणीस प्रतिसाद
By admin | Published: December 30, 2016 12:25 AM