सिडको : गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने सिडको, अंबड भागासह परिसरातील दररोज तब्बल ३०हून अधिक मृतदेहांचे सरण करताना उंटवाडी, मोरवाडीसह सिडको भागातील अमरधाममधील कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक काहीशी कमी झाली असून, चालू महिन्यात कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीमुळे मृतांची संख्या कमी झाल्याने केवळ पाच ते सहा मृतांचे सरण रचले जात आहे.
नाशिक शहरासह सिडको,अंबड भागात मागील एप्रिल महिन्यात कोरोना महामारीने कहर केल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. यातच अनेक रुग्णांना सरकारी अथवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी बेडदेखील मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले होते. सिडकोतील मोरवाडी, उंटवाडी, कामटवाडे, पाथर्डीसह सर्वच अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी दररोज तीसहून अधिक मृतदेहांचे सरण करण्याची वेळ अमरधाममधील कर्मचाऱ्यांवर आली होती. अमरधाममधील कर्मचाऱ्यांना त्यासाठी २४ तास काम करावे लागत होते. एकापाठोपाठ दिवस-रात्र मृतदेह अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी येत होते. कोरोनाने मृत्यू झालेल्यांपासून त्यांचे नातेवाईकदेखील अग्निडाग देण्यापासून दूर राहत असल्याने अंत्यविधीचे सर्व सोपस्कार अमरधाममधील कर्मचारी करीत होते. बऱ्याच वेळा अमरधाममध्ये असलेल्या बेडच्या क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह अंत्यविधीसाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडून प्रसंगी आवारातच अंत्यसंस्कार करावे लागले, तर अनेकवेळा अक्षरशः नंबर लावावे लागत होते. परंतु एप्रिल महिना उलटल्यानंतर मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने तसेच रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले. परिणामी अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतांच्या संख्याही कमी झाली. आता सध्या दररोज केवळ पाच ते सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यामुळे अमरधाममधील कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात विश्रांती मिळू लागली आहे. (फोटो १३ अमरधाम)
कोट..
कोरोना महामारीमुळे अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी दररोज तीसहून अधिक मृतदेह येत होते. त्याकाळात आम्ही दिवसरात्र २४ तास काम करत होतो. परंतु मे महिन्यात कडक लॉकडाऊन केल्याने ही संख्या कमी झाल्याने समाधान वाटते. एप्रिल महिन्यात तीसहून अधिक मृतांचे सरण करावे लागत होते, आता ही संख्या केवळ पाच ते सहावर येऊन ठेपली आहे, ही समाधानाची बाब आहे.
सद्दाम मणियार
अमरधाम ठेकेदार
Attachments area