दुकाने बंद, मात्र शटरसमोर गर्दी
नाशिक: जुने नाशिक येथील काही दुकाने बंद करण्यात आलेली असली तरी दुकानांसमोर तरुणांचे टोळके एकत्र बसले असल्याचे दिसते. दुपारच्या सुमारास बंद दुकानांसमोर तरुणांच्या गप्पा रंगताना दिसतात. शहरात जमावबंद लागू असून अशा प्रकारची गर्दी होत असतानाही पोलिसांकडून कारवाई केली नसल्याचे दिसते.
रिक्षाचालकांकडून उल्लंघन सुरूच
नाशिक : प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली असली तरी रिक्षाचालकांकडून जादा प्रवासी वाहतूक सुरूच आहे. रिक्षाचालकासह दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र चालकांकडून जादा प्रवासी वाहतूक करून नियमांचा भंग केला जात आहे.
गंगाघाटावर बेघरांसाठी अन्नछत्र सुरू
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहर बंद असल्याने गोरगरिबांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोदाघाटावर अशा नागरिकांसाठी काही सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्यासाठी दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली असून, गेारगरिबांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
रविवार कारंजा परिसरात शुकशुकाट
नाशिक : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा येथे सर्व व्यवहार बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. रविवार कारंजा येथे किराणा होलसेल मालाची मोठी बाजारपेठ असून, ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. वीकेंड निर्बंधामुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवून शासनाला सहकार्य केले असल्याने या संपूर्ण परिसरात शांतता दिसून आली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा सुरूच
नाशिक : कोरोनाचे संक्रमण वाढलेले असताना शहरात स्वच्छता कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. रस्त्यांवरील केरकचरा झाडणे तसेच त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम स्वच्छता कर्मचारी करीत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून सेवा सुरू असताना नागरिकांकडूनदेखील त्यांना सहकार्य केले जात आहे.