कोरोनाची साथ शहर व परिसरात आटोक्यात येताना दिसू लागली असली तरी अद्याप दररोज पाचशेपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत, तसेच कोरोनाबाधितांचा आकडाही तीसपेक्षा जास्त आहे. यामुळे कोरोना नाशकातून सध्यातरी हद्दपार झालेला नाही. लॉकडाऊनचे कडक निर्बंध जरी शिथिल केले असले तरी जीवनावश्यक वस्तू विक्रीवर सकाळी अकरा वाजेपर्यंतचे निर्बंध कायम आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये अन्य वस्तू विक्रीवर असणारी बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तरीदेखील शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यांवर, तसेच उपनगरांमध्ये वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत उपनगरीय भागांमध्ये भरणाऱ्या भाजी बाजारांमध्येही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन काटेकोरपणे होताना दिसत नसल्याने धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य शासनाकडून लावण्यात आलेले कडक निर्बंध अद्यापही कायम आहेत. हे सर्व निर्बंध नाशकात पूर्णपणे लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्टही केले आहे. त्याचप्रमाणे संचारबंदीदेखील अद्याप मागे घेण्यात आलेली नाही. जमावबंदीचा आदेशही पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडून कायम ठेवण्यात आला आहे, तरीदेखील शहरात सर्रासपणे गर्दी दिसू लागली आहे. बहुतांश नागरिक खबरदारीच्या उपाययोजनांबाबत आता उदासीनता दाखवीत असल्याचेही पाहावयास मिळत आहे.
---इन्फो--
काही रस्ते बॅरिकेड लावून बंदच
शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील अशोका चौफुलीवरून वडाळा गावाकडे जाणारा पखालरोड, तसेच हॅप्पीहोम कॉलनीमार्गे द्वारकेकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. सिग्नलवरून डावीकडे व उजवीकडे वळण घेता येत नाही. या ठिकाणी बॅरिकेड अद्याप कायम आहे. त्याचप्रमाणे भोसला शाळेच्या प्रवेशद्वारापासून जेहान सर्कलकडे जाणारा एकेरी रस्ता अद्यापही वाहतुकीसाठी बंदच आहे. जेहान सिग्नलवर डावीकडे, तसेच उजवीकडे नृसिंहनगरकडे वळण घेण्यास बंदी घातली आहे. काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडीकडे जाणारा रस्ता बंद आहे. त्रिमूर्ती चौकातून कामटवाडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड कायम आहे. साईनाथनगर येथून इंदिरानगरकडे जाणारा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.