नाशिक : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी झाली असून आता रुग्णसंख्या घटत चालल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने समाजकल्याण आणि मेरी येथील कोविड सेंटर बंद केले आहेत. त्यानंतर आता खासगी रुग्णालयातील आरक्षित बेडदेखील अनारक्षित करण्यासाठी अर्ज येत आहेत. तथापि, शासकीय आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत त्याबाबत निर्णय घेता येणार नाही. त्यानंतर मात्र निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीला खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महापालिकेने समाजकल्याण विभाग, नंतर मेरी येथील शासकीय क्वार्टर्स आणि तदनंतर ठक्कर डोम येथे कोविड सेंटर सुरू केले. त्यानंतर खासगी रुग्णालयातदेखील रुग्णांवर उपचार होऊ लागले. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने खासगी रुग्णालयातील ३५ पेक्षा अधिक बेड असतील तर महापालिकेने दहा टक्के बेड आरक्षित करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे साडेचार हजार बेड्स आरक्षित आहेत. याशिवाय दिवाळीनंतर संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून सुमारे दहा हजार रुग्णांची सोय होऊ शकेल, असे नियोजन केले होते. खासगी रुग्णालयांबरोबरच सिडकोतील संभाजी स्टेडीयम तसेच पंचवटीतील माँसाहेब मीनाताई ठाकरे स्टेडीयम येथेदेखील कोविड सेंटर करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात नोव्हेंबरपासूनच रुग्णसंख्या कमी होऊ लागली आणि नंतर रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे.
आता पंचवीसपेक्षा कमी रुग्णसंख्या असेल तर कोविड सेंटर बंद करण्यास परवानगी देण्यात आल्याने समाजकल्याण विभागाचे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मेरी येथील सेंटरदेखील बंद करण्यात आले आहे. तेथील कर्मचारी अन्यत्र नियुक्त करण्यात आले असून केवळ ठक्कर डोम हे खासगीतील कोविड सेंटरच सुरू आहे. आता खासगी रुग्णालयांकडूनदेखील अशाच प्रकारे रुग्णालयाची बेड आरक्षणातून मुक्तता करण्याची मागणी होत आहे. तथापि, राज्य शासनाच्या सूचनेनुसार ३१ जानेवारीपर्यंत खासगी रुग्णालयांना मुक्तता मिळणार नाही. त्यानंतर मात्र विचार करता येईल, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
इन्फो..
आता ते नियमित रुग्णालय होण्याची शक्यता
कोराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर केवळ अशा रुग्णांवरच उपचार करण्यासाठी काही खासगी वैद्यकीय व्यावसायिक पुढे आले होते. त्यामुळे केवळ कोरोनाबाधितांवरच उपचार करण्यासाठी आठ ते दहा रुग्णालये सुरू झालीत. आता त्यांचे काम होत आले असले तरी संबंधित वैद्यकीय व्यावसायिक नियमित रुग्णालये सुरू करण्याच्या तयारीत आहेत. कोरोना रुग्णालय म्हणून त्यांची मान्यता गेल्यानंतर ते नवीन रुग्णालय सुरू करू शकतील, असे सूत्रांनी सांगितले.