नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवारी मध्यरात्रीपासून संपुष्टात आला असला तरी सोमवारपासून राज्य शासनाच्या अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसारच उद्योग, व्यापाराला सुरुवात होणार असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा तसेच पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याने गेल्या १२ तारखेला जिल्ह्यात बारा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने रुग्णवाढीचा वेग कमी झाला. त्यामुळे लॉकडाऊन उठविण्यात आला असून, रविवारी मध्यरात्री लॉकडाऊनची मुदत संपुष्टात आल्याने सोमवारपासून उद्योग, व्यापाराला सुरुवात हेाणार आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार सोमवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. कोरेाना प्रतिबंधक निमयांचे पालन करून दुकानदारांना व्यवसाय सुरू करता येणार आहे. बाजार समितींचे व्यवहार नियमांच्या अधीन राहून सुरळीत सुरू होणार आहे.
आौद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू करण्यासदेखील परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होणार आहे. मात्र कोराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे लागणार आहे. हॉटेल्स सुरू करण्यावर असलेले निर्बंध राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कायम राहाणार आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत त्यांना फक्त होम डिलेव्हरी करता येणार आहे.
सलून व्यवसाय तसेच मंगल कार्यालये बंदच राहणार आहे.
ज्या ठिकाणी गर्दी हेाते त्यावर नियंत्रण कायम राहणार आहे. त्यामुळे भाजीमंडई, मंगल कार्यालाये, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्य व चित्रपटगृहे, आठवडे बाजार हे बंदच राहाणार आहे. राज्य शासनाने यापूर्वी लागू केलेले निर्बंध या आस्थापनांना लागू राहणार आहे.
--कोट--
लॉकडाऊन पूर्ण उठलेला नाही
राज्य शासनाने यापूर्वीच लागू केलेले निर्बंध यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात पूर्ण लॉकडाऊन उठला आहे अशा गैरसमजात कुणी राहू नये. आपण मोठ्या प्रयत्नाने रुग्णसंख्या कमी केलेली आहे. परंतु निर्बंधाचे उल्लंघन केल्यास रुग्णसंख्या वाढायला वेळ लागणार नाही. याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधाचे काटेकोर पालन करावे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
--इन्फो--
--हे राहणार सुरू
१) किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११
२) कारखाने सुरू करण्यास परवानगी
३) कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरळीत होणार
४) अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू करता येणार
५) हॉटेल्सची पार्सल सुविधा रात्री आठ वाजेपर्यंतच
६) दूध विक्री
७) भाजीपाला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत
८) पाच लोकांच्या उपस्थितीत नोंदणी विवाह
--इन्फो--
हे बंद राहणार
मंगल कार्यालय, लॉन्स, भाजी मंडई, सिनेमा आणि नाट्यगृहे, व्यायामशाळा, आठवडे बाजार.