नाशिक जिल्ह्यात अद्यापपावेतो बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची एकही घटना घडली नसली, तरी संभाव्य धोका लक्षात घेता, आतापासूनच सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील जलाशयांवर स्थलांतरित होणाऱ्या पक्षी व पाळीव पक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या वर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रमानुसार, क्लोअॅकल व ट्रॅकयल स्वॅब या सिरम सॅम्पल संकलित करून प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे, तसेच जिल्हास्तरावर दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, याशिवाय पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे.
--------
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
* जिल्ह्यात पोल्ट्री फार्मची संख्या पाहता, बर्ड फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने सोडीयम कार्बोनेटने कोंबड्याचे खुराडे, गुरांचे गोठे, गावातील गटारे, पशुपक्ष्यांचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर फवारणी केली जात आहे.
* पोल्ट्री फार्मचालकांनी पक्ष्यांसाठी खाद्यपदार्थ वाहतुकीदरम्यान काळजी घेतली जात आहे, तसेच कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी, स्थलांतरित पक्षी यांच्यात बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
------
जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला नाही. मात्र, लगतच्या राज्यांमध्ये काही प्रमाणात संसर्ग झाल्याचे कळाले आहे. त्यामुळे सीमेवरील गावांवर पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. विष्णू गर्जे, पशुसंवर्धन अधिकारी
------
जिल्हास्तरीय दक्षता पथक स्थापन
बर्ड फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हास्तरावर दक्षता पथक स्थापन करण्यात आले असून, कुक्कुट पक्षी, वन्यप्राणी, स्थलांतरित पक्षी यांच्यात बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यास त्याची त्वरित माहिती रोग अन्वेषण विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.