नाशिक : जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सातत्याने लसींचा साठा केवळ दोन-तीन दिवसांपुरताच उपलब्ध आहे. त्यात कोरोना वाढू लागल्यावर नागरिकांकडून लसीच्या मागणीतही वाढ झाल्याने गत पंधरा दिवसांपासून साठ्याबाबत सातत्याने अनिश्चितता आहे. सध्या हीच परिस्थिती कायम असल्याने लसीकरणाला अधिक वेग देण्यातदेखील जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला मर्यादा येत आहेत.
कोरोना संसर्गात नाशिक राज्यात अव्वल शहरांमध्ये येऊ लागल्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीमेला अजून वेग देण्याचा निर्णय गत आठवड्यातच करण्यात आला होता. त्यानुसार लसीकरण केंद्रेदेखील वाढविण्यात आली आहेत. शासनाने नाशिकमध्ये कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लस उपलब्ध केल्या आहेत. कोव्हॅक्सिन ही लस खासगी रुग्णालयांमध्ये दिली जात असून तर मनपा रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्ड लस उपलब्ध केली आहे. त्यात शहरात दररोज सुमारे ८ हजारांवर तर जिल्ह्यात साधारणपणे ६ हजारांवर नागरिकांचे लसीकरण होत आहे. मात्र दररोज रुग्ण बाधित होण्याचा आकडा पाच हजारांवर पोहोचल्याने लसीकरणाचा वेगदेखील कमीच असल्याचे भासू लागले आहे. परंतु, त्यात वाढ करण्यासाठी तितक्या मुबलक प्रमाणात लसींचा स्टॉकदेखील उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता आहे.
इन्फो
दोन आठवड्याचा स्टॉक आवश्यक
त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला हा स्टॉक केवळ सोमवारपर्यंतच कसाबसा पुरणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, जुने नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयांबरोबरच एकूण २७ ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले हाेते. मात्र, त्यातही काही वेळा लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस साठा संपुष्टात आल्याने परत जावे लागले होते. त्यामुळे मनपाच्यावतीने दीड लाख लसींचे डोस मागवले असले तरी अद्याप असा मोठा लससाठा मिळालेला नाही. नवीन लसींचा स्टॉक कधी मिळणार, त्याबाबतही निश्चिती नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊनच लवकरात लवकर लसींचा मोठा स्टॉक नाशिकला मिळणे आवश्यक झाले आहे.
इन्फो
आठवड्याला दीड लाख अपेक्षित, मिळते ५० हजार
सध्या जिल्ह्यात सातत्याने किमान १५ हजार लसींची किमान मागणी आहे. तसेच नागरिकदेखील कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने लस घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे या मागणीतही दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दिवसाला किमान वीस हजार याप्रमाणे आठवडाभरासाठी किमान दीड लाख लस मिळणे आवश्यक झाले आहे. प्रत्यक्षात मात्र ४० ते ५० हजार लस मिळत असल्याने ती तीनच दिवस पुरते. त्यामुळे वारंवार लसींचा तुटवडा होऊन काही केंद्रांवर लस न मिळण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
इन्फो
मिळावा अधिक साठा
येत्या १ एप्रिलपासून कोरोना लसीकरण ४५ वर्षावरील सर्वांना देण्याचे निर्देश आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या लसींचा अधिकाधिक साठा मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या माध्यमातून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
डाॅ. कपिल आहेर, जिल्हा आराेग्य अधिकारी