नाशिक : महापालिका निवडणूक व धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ६ मार्चपर्यंत शस्त्र व जमावबंदी तसेच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस उपआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी आदेश जारी करताना म्हटले आहे की, शहरात सामाजिक, राजकीय व कामगार संघटनांचे मोर्चे, निदर्शने, बंद, विविध आंदोलने, धार्मिक सण, समारंभ, निवडणुकीचा प्रचार व मतदान नजीकच्या काळात होणार असून, या काळात शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहे. ६ मार्चपर्यंत हे आदेश जारी राहतील. या काळात रस्त्यावरील जाणाऱ्या मिरवणुकीतील व्यक्तींचे वागणे, बीभत्स व अश्लील हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या लाउड स्पीकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तीव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर, सार्वजनिक स्पिकरची गाणी, संगीत ड्रम, ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजविणे किंवा कर्कश आवाज करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आयुक्तालय हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश
By admin | Published: February 21, 2017 12:48 AM