नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २८) जाहीर होणार असून, या निकालातून नाशिक विभागातील १ लाख ६८ हजार ३५८ विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाविषयीची उत्सुकचा शिगेला पोहोचली आहे.नाशिक विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडलेल्या बारावीच्या लेखी परीक्षेत नाशिक विभागातून एकूण १ लाख ६८ हजार ३५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात नाशिक जिल्ह्यातील ७४ हजार ५६४, धुळ्याच्या २५ हजार २८२, जळगावातील ५१ हजार ५७२ व नंदुरबारमधून १६ हजार ९४० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्र्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२, तर वाणिज्य शाखेतील तीन लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक तीन लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर सर्वात कमी ३२ हजार ३६२ विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ट झाले आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मेच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाल्याने, त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांना त्याचा निकाल बीएसएनएलच्या मोबाइलवरून कॅपिटल लेटरमध्ये एमएचएएससी टाइप करून स्पेस दिल्यानंतर आसनक्रमांक टाइप केल्यानंतर ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस पाठवून निकाल प्राप्त करता येणार आहे. दरम्यान, या परीक्षेनंतर अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीही पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून, यावर्षी ही परीक्षा जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये होणार असल्याचे राज्य मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
बारावीचा निकाल आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:37 AM