नाशिक : नाशिक येथील मुक्त विद्यापीठाने दोन हजार रुपयांच्या पुनर्नोंदणी शुल्क वसुलीसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखले आहे. या विद्यार्थ्यांना पुनर्नोंदणी शुल्काची दोन हजार रुपये भरल्याची पावती सादर केल्यानंतर निकाल वितरित करणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पुनर्नोंदणी प्रक्रियेतर्गत शुल्क भरल्याची पावती सादर न करणाऱ्या आणि प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचे ऑगस्ट २०२१ परीक्षेतील निकाल रोखण्यात आले आहे.
पुनर्नोंदणीचे शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतरच हे निकाल विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. मात्र, विद्यापीठाने शुल्क वसुलीसाठी घेतलेल्या या धोरणामुळे पुनर्नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची पडताळणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश देण्यात आला का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम ठरावीक कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असले तरी अनेक विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. त्यामुळे दोन हजार रुपयाचे पुनर्नोंदणी शुल्क भरून त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी दिली जाते. अशाप्रकारे पुनर्नोंदणी करून ऑगस्ट २०२१ परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी विद्यापीठाने दिली होती. संबंधित विद्यार्थ्यांनी पुनर्नोंदणी शुल्क भरले अथवा नाही याची खातरजमा न करता त्यांची परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने रोखले असून शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना निकाल दिले जाणार नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेशही रखडले आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी निकाल मिळविण्यासाठी शुल्क भरल्याची पावती ई मेलद्वारे पाठविण्याची सूचना विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना पुनर्नोंदणी करून अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतरही परीक्षा देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुनर्नोंदणीची सूचना देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी पुनर्नोंदणी शुल्क भरलेले नाही, अशा चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने रोखले आहे. त्यांनी शुल्क भरल्याची पावती सादर केल्यास निकाल वितरीत केले जातील. असे परीक्षा नियंत्रक डॉ. भटू प्रसाद पाटील यांनी सांगितले.