पंचवटी : गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने नियम व अटींवर बाजार समिती सुरू करण्यात आली असली तरी, बाजार समितीत किरकोळ शेतमाल विक्रीसाठी व किरकोळ खरेदीसाठी येणाऱ्यांना बंदी घालण्यात आल्याने तसेच त्यातच शेतकरी बाजार समितीबाहेर शेतमाल विक्री करत असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.
बाजार समितीत दैनंदिन ४० टक्के शेतमालाची आवक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर करून बाजार समितीत किरकोळ खरेदी-विक्री बंद केली आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडत्यांकडे अडकले असल्याने शेतकरी बाजार समितीबाहेर पेठरोड, दिंडोरी रोडवर मेरी रस्ता ठिकाणी भाजीपाला विक्री करत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर स्पर्धा नसल्याने व त्यातच शेतकऱ्यांना जागेवर शेतमालाचे पैसे मिळत असल्याने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री न करता परस्पर बाहेर शेतमालाची विक्री करत आहेत. बाजार समिती सुरू होऊन आठवडा लोटला असला तरी काही निर्बंधांमुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटली आहे, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. अनेक शेतकरी किरकोळ शेतमाल विक्रीला आणतात, त्यात व्यापारी किरकोळ शेतमाल खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांवर बाजार समितीबाहेर माल विकण्याची वेळ आली आहे.
इन्फो====
बाजार समिती उत्पन्न घटले
कोरोना पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून बाजार समितीत किरकोळ शेतमाल खरेदी-विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. बाजार समिती बंद करण्यापूर्वी दैनंदिन ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न मिळायचे, आता केवळ दोन ते सव्वादोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. आठवड्यात बाजार समितीचे अंदाजे १० लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे.