सिडको : सिडकोतील निवासी वस्तीत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून न टाकता ते कायम करण्यासाठी सरकारने विशेष तरतूद करावी, यासह पेलिकन पार्क, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या प्रश्नांना आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली. विविध मुद्द्यांवर चर्चा करताना मुंबई शहराच्या धर्तीवर नाशिक शहरासाठी एसआरए योजना लागू करावी जेणेकरून गरिबांना रास्त दरात मुबलक घरे उपलब्ध होतील, असे नमूद करून आमदार हिरे यांनी सिडकोत १७ एकर जागेवरील पेलिकन पार्कच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेने सदर पार्क हा पुन्हा पीपीपीवर विकसित करण्याचा घाट घातलेला असल्याने हा पार्क पीपीपीवर विकसित न करता शासनाने तो विकसित करावा, अशी मागणी केली आहे.सिडकोच्या ६ वसाहती असून, त्यात कामगार, मजूर घटकातील वर्ग राहतो. या वर्गास जास्त महागडी घरे घेणे शक्य होणार नाही त्यामुळे नागरिकांनी कुटुंब वाढल्याने घरांमध्ये सुधारणा करून त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सिडको येथील अतिक्रमणाचा मुद्दा मनपाने उपस्थित करून अतिक्रमण काढण्यासाठी घरांवर फुल्या मारल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. सिडकोची अतिक्रमणे ही कायम करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. सातपूर येथे पोलीस कर्मचाºयांºया निवासस्थानांची अवस्था बिकट झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा, क्रीडांगण, उद्यान, ड्रेनेज या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसेल तर त्यांचे आरोग्य धोक्यात येईल परिणामी ते आपले संरक्षण करण्यास सक्षम राहणार नाही त्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानांची डागडुजी त्वरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सिडकोतील अतिक्रमणे कायम करण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:30 AM