----
मुख्यालयात लसीकरण सुरू करण्याची मागणी
नाशिक : महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयात लसीकरण सुरू करण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी सेनेने केली आहे. अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या मुख्यालयात सुमारे पाचशे ते सातशे कर्मचारी असून, त्यांना लसीकरणासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे आता या कार्यालयात लसीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---
विशेष भत्ता देण्याची मागणी
नाशिक : कोरोनाकाळात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना नवी मुंबई महापालिकेप्रमाणे तीनशे रुपयांचा विशेष भत्ता, तसेच कोरोना लागण झालेल्या कामगारांना विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी सफाई कामगाार विकास युनियनने केली आहे. सुरेश दलोड आणि सुरेश मारू यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
----
मनपाने सुरू केला आपत्ती व्यवस्थापन कक्ष
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीविषयक पूर्वसूचना देण्यासाठी, तसेच मदत देण्यासाठी हा कक्ष स्थापन केला असून, त्यातील हेल्पलाइन नंबरदेखील जाहीर करण्यात आले आहे.
-----
मनपाचे लसीकरण आज बंद
नाशिक : महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असले तरी रविवारी (दि.२०) लसीकरण होणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लसींचे डोस मिळत नसल्याने जेमतेम लसीकरण सुरू आहे. आता २१ जूननंतर केंद्र शासन किती लसींचे डोस उपलब्ध करून देणार याकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.