-----
स्पर्धा परीक्षेतील भरतीप्रक्रिया सुरू करण्याची मागणी
सिन्नर : स्पर्धा परीक्षेतील भरतीप्रक्रिया लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी परफेक्ट करिअर अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून पोलीस, रेल्वे, सैन्य दल, एमपीएससी भरतीप्रक्रिया रखडली आहे. दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या युवक व युवती भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करीत आहेत. या तरुणांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भरतीप्रक्रिया लवकरात लवकर व्हावी यासाठी परफेक्ट करिअर अकॅडमीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
---
अभिषेक कासार यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
सिन्नर : वैद्यकीय परीक्षेतील यशाबद्दल अभिषेक कासार यांचा मिठसागरे ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक भगीरथ चतुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास बाजार समितीचे माजी संचालक परसराम कथले, शिक्षक नेते आनंदा कांदळकर, डॉ. गंगाधर कासार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभिषेक कासार यांनी परराष्ट्रीय वैद्यकीय परीक्षेत देशात अठराव्या, तर राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.
-----
माथाडी कामगारांच्या समस्येसाठी साकडे
सिन्नर : आशा स्वयंसेविका यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून छावा माथाडी कामगार युनियन यांना संपर्क करण्यात आला. त्यांच्या मागण्या छावा माथाडी कामगार युनियनतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडण्यात आल्या. टोपे यांनी या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करत मागणी पूर्ण केली. यावेळी छावा माथाडी कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदीप बिल्लोरे पाटील, योगेश केवारे, मनोज जरांगे, शत्रुघ्न झुंबड, अतुल पांगारकर, संदीप तिळाणे आदी उपस्थित होते.
---------------------
पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी
सिन्नर : पंतप्रधान पीकविमा योजनेची मुदत वाढविण्याची मागणी हिवरगाव (घंगाळवाडी) येथील शेतकरी सोमनाथ सहाणे यांनी केली आहे. पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची लाभदायक योजना आहे. अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेतात. विमा अर्ज भरण्याची मुदत १५ जुलै आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी पेरण्या केल्या त्यातील काहींना दुबार पेरण्या करण्याची वेळ आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी अर्जामध्ये पेरणीची तारीख नोंद करावी लागते. शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने योजनेच्या मुदतवाढीसाठी तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणी सहाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.