पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीचे अडतदार, व्यापाऱ्यांनी आपली अडत व खरेदीचे परवाने बाजार समितीकडे सादर केले.शासनाने नियमन मुक्त धोरण अवलंबल्याचा स्वीकार करत व्यापारीवर्गाने त्याचे स्वागत केले; मात्र या नियमन मुक्त करताना फक्त शहरी बाजार समित्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. मुळात शेतकरी हा १९६८च्या कायद्यानुसार केव्हाही मुक्तपणे आपला शेतमाल कुठेही नेऊन विक्र ी करू शकतो. आज ग्रामीण भागातील बाजार समितीचा विचार केला तर या बाजार समितीमध्ये शेतमालाचा उघडपणे व्यवहार आहे तसेच माल विकला गेल्यावर तत्काळ पैसे देणे बंधनकारक आहे. या भागातील शेतकरी हा बाजार समितीच्या कामामुळे किंवा येथील व्यवहारामुळे खुश होता. त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास नव्हता. या उलट शहरातील बाजार समितीच्या कामात मोठी तफावत आहे. या ठिकाणच्या व्यवहारात शेतकरीवर्गाची पिळवणूक होत आहे. या ठिकाणी भाजीपाला डोळ्यासमोर ठेवून शासनाने हा निर्णय घेणे योग्यच समजावा; मात्र जर कांदा, टमाटा, डाळींब, कडधान्य आदिंचा व्यवहार या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालत असताना शासनाचा हा निर्णय व्यापारीवर्गाला न परवडणारा आहे. आम्ही शेतकरीवर्गाचा माल बांधावर जाऊन खरेदी करू यात आम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही. बाजार समितीमध्ये खरेदी केलेल्या मालावरील खर्च हा आम्हाला न परवडणारा असल्याने आमचे परवाने आम्ही बाजार समितीकडे सुपूर्द करत असल्याचे व्यापारीवर्गानी पत्रात नमूद केले आहे. (वार्ताहर)
पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांकडून परवाने परत
By admin | Published: July 17, 2016 1:03 AM