अमृतकाळात सूड, बदलाचे राजकारण: यंत्रणा सत्ताधाऱ्यांची गुलाम- संजय राऊत
By श्याम बागुल | Published: March 24, 2023 07:22 PM2023-03-24T19:22:03+5:302023-03-24T19:22:43+5:30
सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होते.
नाशिक : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठीच न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. गांधी यांच्या वक्तव्यांनी मोदी यांची बदनामी झाली असेल तर मोदी यांनी खटला दाखल करावयास हवा होता. मात्र, चौथी पार्टी खटला दाखल करते व सुरत न्यायालय यावर निर्णय देते, हे पाहता सर्व यंत्रणांचा अमृतकाळात सूड व बदला घेण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मालेगाव येथे रवाना होण्यासाठी खासदार राऊत यांचे शुक्रवारी (दि. २४) नाशकात काही काळ आगमन झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. न्यायालय, ईडी, सीबीआय याच्यावर किती विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.
सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होत असल्याचे सांगून राऊत यांनी या यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल चौदा पक्षांनी याचिका दाखल केली आहे. या यंत्रणा फक्त सत्ताधाऱ्यांच्या राजकीय विरोधकांच्या चुका शोधतात व कारवाया करून दबाव आणतात, पक्ष फोडतात व सरकार पाडतात एवढेच काम करीत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.