नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या आॅनलाइन वाहन नोंदणीतून जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत २४ कोटी ४५ लाख २३ हजार ४२५ रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़प्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ जानेवारीपासून आॅनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली़ नागरिकांचे सहज व सुलभ पद्धतीने काम होत असल्याने त्यांनी आॅनलाइन प्रणालीला चांगलाच प्रतिसाद दिला असून, शासनालाही महसूल प्राप्त होत आहे़ या दोन महिन्यांच्या कालावधीत ७२ हजार ४५४ अर्ज दाखल झाले होते़ त्याद्वारे ४०.२८ कोटींपैकी २४.४५ कोटी म्हणून ६० टक्के महसूल हा आॅनलाइन पद्धतीने जमा झाला आहे. तर १५ कोटी ८३ लाख ६५ हजार २३१ रुपये रोख स्वरूपात मिळाले आहेत़आरटीओ कार्यालयातील सर्व कामकाज, वाहन नोंदणी आॅनलाइन पद्धतीने सुरू असून, लवकरच वाहन हस्तांतर, बँक बोजा, वाहनांची पुनर्नोंदणी व इतर कामेही आॅनलाइन पद्धतीने केली जाणार आहेत. तसेच ज्या नागरिकांकडे इंटरनेट सुविधा नसेल त्यांना नागरी सेवा केंद्र सीएससी केंद्राद्वारे अर्ज करता येणार आहेत. (प्रतिनिधी)
आॅनलाइन नोंदणीतून २४ कोटींचा महसूल
By admin | Published: March 06, 2017 1:22 AM