नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आलेले अनेक निर्बंध आणि त्यामुळे अर्थचक्र बिघडलेले असतानाही नाशिक जिल्ह्याने महसुली वसुलीत विक्रमी कामगिरी केली आहे. जमीन महसूल, करमणूक, रोजगार, शिक्षण कर आणि गौण खनिज कराच्या माध्यमातून जिल्ह्याने १११ टक्के अधिक वसुली करून दाखविली.
जिल्ह्याला महसूल वसुलीचे २२९००.०० एकूण उद्दिष्ट देण्यात आले होते. जमीन महसूल, करमणूक, रोजगार, शिक्षण कर आणि गौण खनिज कराच्या माध्यमातून जिल्ह्याने २५४ कोटी २८ लाखांची वसुली केली. वसुलीची टक्केवारी १११.०४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महसूल वसुलीचे उद्दिष्ट दीडपट अधिक असताना आणि कोरोनाच्या कठीण काळात सहा महिने लॉकडाऊनमध्ये गेल्याने महसूल वसुली होते की नाही याबाबतची चिंता होती. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे जिल्ह्याने अधिक वसुली करून दाखविली.
मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणांवर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी होती. दैनंदिन कामकाज सांभाळून यंत्रणेला कोरोना नियंत्रणाची जबाबदारी पार पाडावी लागली. अशा परिस्थितीतही कार्यालयीन कामकाजाबरोबरच महसुली वसुलीकडे देखील लक्ष देण्यात आले. दैनंदिन कामकाज सांभाळताना महसुली वसुलीच्या नियोजनावर भर देण्यात येऊन त्यासाठीचे नियोजन करण्यात आले. महसूल यंत्रणेने जानेवारीपासूनच वसुलीवर जोर दिला होता.
--इन्फो--
गौण खनिजचे १४२ कोटींचे उद्दिष्ट असताना केवळ १३१ कोटी इतकीच वसुली होऊ शकली. वसुलीची ही टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे. यंदा वाळू घाटाचे लिलाव होऊ शकले नसल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्न जिल्ह्याला मिळू शकले नाही. मात्र दंड तसेच लिलाव आणि अन्य वसुलीतून ९२ टक्केपर्यंत महसूल मिळू शकला. इतर महसुली करात मात्र शंभर टक्के वसुली झाली.
--कोट--
कठीण काळात तिजोरीला हातभार
मागील वर्षीच्या तुलनेत महसूल वसुलीचे लक्ष्य अधिक होते. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधात अनेक महिने गेले. असे असतानाही उद्दिष्ट साध्य करू शकलो. कोराेनाच्या कठीण काळातही राज्याच्या तिजोरीला हातभार लावला आहे. खडतर लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
--इन्फो--
विभागात नाशिक अव्वल
नाशिक जिल्ह्याने विभागातही अव्वल कामगिरी नोंदविली. १११ कोटींची वसुली करून शासनाच्या महसुलात भर घातली. धुळे जिल्ह्याने ७७.९८ टक्के, नंदुरबार जिल्ह्याने ९२.०३, जळगाव जिल्ह्याने ६६.६६, तर नगर जिल्ह्याने ८५.१८ टक्के इतकीच वसुली केली. विभागाची एकुण महसुली वसुली ९०.४४ टक्के इतकी आहे.