कळवण : कळवणच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयातील शिपाई एकनाथ हिरकण गांगुर्डे (५५) याने पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास तहसीलदार कार्यालयात आत्महत्त्या केली असल्याचे समजते. दुसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदारांचा कक्ष उघडण्यात आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. तीन महिन्यांपासून रजेवर असलेले एकनाथ गांगुर्डे हे काल तहसीलदार कार्यालयात आले होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने व रजेवर असल्याने घरी जाऊन आराम करा, अशी सूचना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गांगुर्डे यांना केली. शिवाय जवळचे नातेवाईक त्यांना यांना घरी घेऊन जाण्यासाठी कार्यालयात आले होत;े मात्र गांगुर्डे यांनी त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्ट नकार देऊन तहसीलदार कार्यालयात थांबणे पसंत केले. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू झाल्याने गांगुर्डे यांनी घरी न जाता तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षातच मुक्काम केला. आज बुधवारी पहाटे नियंत्रण कक्षातून तहसीलदार यांच्या कक्षात गांगुर्डे यांनी प्रवेश करून आतून दरवाजे बंद करून टेलिफोन वायरने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. गेल्या काही महिन्यांपासून गांगुर्डे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने सध्या ते तणावाखाली वावरत होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्त्या केली असल्याचे बोलले जात आहे. रवळजी येथे काही दिवसांपूर्वी गांगुर्डे यांनी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे जवळच्या नातेवाइकांनी सांगितले.
कळवणला महसूल कर्मचाऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: August 04, 2016 1:09 AM