नाशिक : दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देऊन सदरची कामे पूर्ण करावीत; तसेच यासाठी ग्रामविकास आराखड्यातील घेतलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांबाबत आढावा बैठक झाली. त्यात दाभाडी क्लस्टर अंतर्गत गावात राबविण्यात येणाºया पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप, जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण कृषीविकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकुल या योजनांचा आढावा घेण्यात आला.यावेळी गिते म्हणाले, या अभियानाची अंमलबजावणी करताना भूमिगत गटार, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांना अधिक प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामविकास आराखड्यातील सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच भूमिगत गटार यासाठी सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातील गावांच्या समूहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवणे हा श्यामाप्रसाद मुखर्जी अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत जिल्ह्णात मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमधील आठ गावांचा समावेश आहे. या अभियानातून दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव, बेळगाव, तळवाडे, पांढरून, धवळेश्वर या आठ गावांचा विकास करण्यात येत आहे.