नाशिक : केंद्रीय आरोग्य पथकाने मंगळवारी जिल्हा रुग्णालयासह मनपाचे शहरी आरेाग्य केंद्र तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील आरेाग्य सुविधेचीदेखील पाहणी केल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कोरोनारुग्ण आढळत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सुविधेचा तसेच कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरेाग्य समितीने जिल्हा रुग्णालय तसेच येथील प्रयोगशाळा आणि कोरोना रुग्ण कक्षाची पाहणी केली. महापालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रालादेखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी या ठिकाणी असलेल्या सुविधा तसेच उपचारांची माहिती घेतली. आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथील कोरोना सेंटर तसेच टेस्टिंग लॅबचीदेखील पथकाने पाहणी केली. संदर्भ सेवा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच मनपा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. मालेगाव येथील परिस्थितीचादेखील त्यांनी आढावा घेतला.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. असे असले तरी खबरदारी घेण्याची नाशिककरांची जबाबदारी असल्याने प्रशासनाकडून काही प्रमाणात निर्बध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. दर शनिवार आणि रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत.
--इन्फो--
दिल्ली येथील पथक
कोरेानाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य निवारण संस्थेचे हे पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. लॅबमधील तज्ज्ञ समिती सदस्यांनी जिल्ह्यातील संसर्ग वाढीची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला असून त्या अनुषंगाने ते जिल्हावार भेटी देत आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये आल्यानंतर समितीने स्वॅब तपासणी तसेच कोराेना कक्षाचा आढावा घेतला. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती पथकाला देण्यात आली.