नाशिक : विधिमंडळाची अंदाजपत्रक समिती नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वीच या समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मुक्कामी आले असून, दौरा आयोजकांनी त्यांची चांगलीच ऊठबस ठेवली आहे. समितीच्या दौऱ्यापूर्वी आलेल्या स्वीय सहाय्यकाने मात्र नाशिकमधील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सचिवांच्या या अनधिकृत आढाव्याने अधिकारी मात्र अस्वस्थ झाले असून, जर स्वीय सहाय्यकच आढावा घेऊन ठरविणार असेल तर समितीच्या दौऱ्याची गरजच काय, असा सवालही केला जात आहे.
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अनुसूचित जाती व कल्याण समिती व त्यापाठोपाठ पंचायत राज समिती नाशिक दौऱ्यावर येऊन गेले असून, या समितीचे कवित्व अजूनही सुरू आहे. समितीचे सदस्य वगळता त्यांच्या सोबत आलेले सहाय्यक व कार्यकर्त्यांची ठेप ठेवताना दमलेले अधिकारी अजूनही उसंत घेऊ शकलेले नाहीत. ठेकेदार अद्याप बिलांसाठी उंबरे झिजवत आहेत. ते कमी की काय, विधिमंडळ अंदाजपत्रक समितीचा दौरा निश्चित झाला आहे. या समितीच्या दौऱ्याचे आयोजन महसूल विभागाकडे असले तरी जवळपास २५ शासकीय कार्यालयांच्या गेल्या पाच वर्षांतील निधी खर्चाचा आढावा समिती घेणार असल्याने साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे. गेल्या आठ दिवसांपासून प्रत्येक विभागात समितीसाठी माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, त्यातच दोन दिवसांपासून समितीचे अध्यक्ष असलेल्या सदस्यांचे स्वीय सचिव मुक्कामी येऊन थांबल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना या सचिवामार्फत शासकीय विश्रामगृहावर पाचारण करण्यात येत असून, राज्य, केंद्र शासनाकडून गेल्या पाच वर्षांत किती निधी आला, तो कशावर, किती खर्च केला, किती निधी शिल्लक राहिला, कामाबाबत किती तक्रारी प्राप्त झाल्या, त्याची निर्गती कशी केली, अधिकारी किती वर्षांपासून कार्यरत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा सगळा अहवाल समिती अध्यक्षांना सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, जर स्वीय सहाय्यकच समितीच्या दौऱ्यापूर्वी प्रत्येक अधिकाऱ्याचा आढावा घेणार असेल तर समितीच्या दौऱ्याची गरज काय, असा प्रश्न अधिकारी विचारत आहेत. विशेष म्हणजे स्वीय सहाय्यक यांच्या पदापेक्षाही अनेक वरिष्ठ अधिकारी सकाळपासून सहाय्यकाच्या मर्जीची वाट पाहत तासन्तास विश्रामगृहावर ताटकळत उभे राहत आहेत.
रविवारी सकाळी तर समितीचे सहाय्यक हजेरी घेणार म्हणून नाशिकहून बदलून पर जिल्ह्यात गेलेल्या अनेक अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सहाय्यकाच्या दरबारात हजेरी लावण्यात आल्याचे चित्र विश्रामगृहावर दिसून आले.
चौकट------
वर्गणीचा जाच; अधिकारी मेटाकुटीस
या समितीच्या निमित्ताने आयोजकांनी तयारीचा भाग म्हणून सक्तीची वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ज्या खात्याला अधिक आजवर निधी मिळाला त्या खात्याचा त्यात वाटा अधिक असे सूत्र त्यासाठी अवलंबिण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष, सदस्य शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार असल्याचे, त्यांच्या दौऱ्यात नमूद असताना मात्र, त्यांच्या नावे पंचतारांकित हॉटेलची सोय दाखवून पैसे गोळा केले जात असल्याची
तक्रारही केली जात आहे. या आर्थिक पिळवणुकीचा मानसिक व आर्थिक ताणाने अधिकारी मेटाकुटीस आले आहेत.