ठळक मुद्देभूमिहिनांना जमिनी देण्याचे निर्देश : तलावाच्या कामांसाठी साकडे
नाशिक : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी (दि. १९) नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन कामकाज जाणून घेतले. भूमिहिनांना सरकारी, गायरान जमिनी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर पाझर तलावांची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याची अनुमती मिळावी, अशी विनंती जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मुश्रीफ यांचे स्वागत महिला बचत गटांकडून तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू प्रातिनिधिक स्वरूपात भेट देऊन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेताना मुश्रीफ यांनी विविध विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाचा किती निधी उपलब्ध आहे, यातील खर्चित-अखर्चित निधीची माहिती घेतली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात एकूण किती घरकुलांचे उद्दिष्ट आणि पूर्तता झाली, याचीही माहिती घेतली व महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन लाभार्थी योजनेंतर्गत भूमिहिनांना जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी जमिनी, गायरान जमिनी, महामंडळाच्या जमिनीतून जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने ग्रामीण भागात पाझर तलावांचे काम हे जिल्हा परिषदेमार्फत केले जावे, अशी विनंती करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. ग्रामपंचायत विभागाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाणून घेतले. त्याचबरोबर स्मशानभूमी, शाळा, अंगणवाड़ी बांधकामावर भर देण्याच्या सूचना दिल्या. कुपोषण मुक्तीसाठी राबविलेल्या एक मूठ पोषण उपक्रम, २२१ अनुकंपा पदांची भरती, मुख्याध्यापक पदोन्नती, सर्व सेवाज्येष्ठता याद्यांची प्रारूप यादी १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून रिक्त पदांचा अनुशेष तत्काळ भरण्याचे निर्देश दिले. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी आदी विभागप्रमुख उपस्थित होते. (फोटो १९ झेडपी)ग्रामविकास मंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 1:40 AM