नाशिक : लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली जिल्ह्यातील आधार केंद्रे पुन्हा एकदा कार्यान्वित झाली असून, अनलॉकनंतर सर्वप्रकारचे व्यवहार सुरू झाल्याने आधाराची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. या केंद्रांसाठी नियुक्त असलेल्या एकूण १८२ आस्थापनांमध्ये कामकाजाला सुरुवात झाली आहे.
लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली आधार अपडेशनची सेवा आता पुन्हा कार्यान्वित झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अनलॉक जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सरकारी कार्यालयांमधील ८७, बँकांमधील ३७, कॉमन सर्व्हिस सेंटर्सची ५२, तर टपाल कार्यालयांतील ६ अशी एकूण १८२ केंद्रे जिल्ह्यात पूर्ववत सुरू झाली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालये, तलाठी कार्यालये, मंडळ कार्यालयांमध्ये असलेली आधार सेवा सुरू करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत शासकीय कार्यालयांमधील ८२ केंद्रे सुरू झाली असली तरी उर्वरित केंद्रांच्या सॉफ्टवेअर अपडेशनचे काम सुरू असल्याने येत्या दोन दिवसांत ही केंद्रेदेखील सुरू हेाणार आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अंदाजे ११० केंद्रांचे नियोजन आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरची शासकीय जागेत सुरू असलेल्या केंद्रांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात अशी ५२ केंद्रे आहेत.
कोरोनाच्या संक्रमणाच्या दोन लाटांमुळे आधार केंद्रांची अनेक कामे रखडली आहेत. कोणत्याही शासकीय कामांसाठी, बँकांचे व्यवहार असोत की शैक्षणिक कामकाज प्रत्येक ठिकाणी आधार कार्डाची गरज असते. परंतु लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे रखडली आहेत. विमान प्रवास तसेच रुग्णालयाशी संबंधित कामांसाठीदेखील आता आधार कार्डांची मागणी होऊ लागल्याने अपुऱ्या माहितीच्या आधारामुळे अनेकांची कोंडी झाली. त्यामुळे आधार अपडेशनसाठी आता गर्दी हेाण्यास सुरुवास झाली आहे.