नाशिक : गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त व बारमाही नैसर्गिकरीत्या प्रवाहित ठेवण्यासाठी गोदावरीच्या उपनद्या, नैसर्गिक नाले व गोदापात्रातील प्राचीन सोळा कुंडं पुनर्जीवित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. या आदेशानुसार गोदावरीच्या प्रगट दिनाचे औचित्य साधत सोमवारी (दि.६) जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांना साकडे घातले. सिंहस्थ विकासाच्या नावाखाली सातत्याने गोदावरी नदीपात्राभोवती कॉँक्रिटीकरण करण्यात आले. हे कॉँक्रिटीकरण करताना कुठल्याही प्रकारची दूरदृष्टी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दाखविली नाही. यामुळे नदीपात्रातील नैसर्गिक जिवंत जलस्त्रोत, उपनद्यांचा प्रवाह, प्राचीन कुंडे बंद झाली. यामुळे गोदावरीच्या पात्रातून शुद्ध नैसर्गिक पाणी प्रवाहित होण्याऐवजी गटारीच्या सांडपाण्याप्रमाणे दुर्गंधीयुक्त पाणी प्रवाहित होत आहे. गेल्या वर्षी नाशिककरांना प्रथमच गोदावरी कोरडीठाक पडल्याचे चित्र बघावे लागले. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या पदरी निराशा पडत होती. त्यामुळे चक्क टॅँकरने गोदावरीचे रामकुंड पाण्याने भरण्यात आले होते. एकूणच गोदावरीचा नैसर्गिक जलस्त्रोतांचा संपर्क नदीशी तुटला असून, नदी संकल्पनेला महापालिकेने छेद दिला हे यामागील मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष पाण्याचा मानवी वसाहतीबरोबरचा संबंध या विषयावरील अभ्यासक वास्तुविशारद डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी संशोधनानंतर काढला आहे. बस्ते यांनी गोदावरी प्रवाहित करण्यासाठी भूगर्भशास्त्रानुसार उपाययोजनांचा अहवाल राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. सदर अहवाल व त्याआधारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यापुढे सादर क रण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कुंडांच्या पुनर्जीवितासाठी साकडे
By admin | Published: February 07, 2017 12:28 AM