नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे कुंभमेळा यशस्वी झाला असून, त्यामुळे प्रशासनाने यंदा कोणीतीही खळखळ न करता कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी बाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.जागतिक सोहळा म्हणून गणला गेलेला कुंभमेळा कोणत्याही अडचणींशिवाय पार पडला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाईपासून सर्वच कामांची जबाबदारी उत्साहात पार पाडली. त्याची बक्षिसी म्हणून गतवर्षीच्या तुलनेत अधिक म्हणजेच २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांंना १३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी १३ हजार रुपये अनुदान देण्यात आले आणि दोन हजार रुपये नंतर देण्याचे जाहीर करण्यात आले होते. ते अद्यापही देण्यात आले नाही, याचा विचार करून पालिका कर्मचाऱ्यांना यंदा सर्व रक्कम आणि कुंभमेळा यशस्वीतेबद्दल २० हजार रुपयांची बक्षिसी द्यावी, अशी मागणी सुरेश मारू, रमेश मकवाना, रंजित कल्याणी, सुनील पवार,जयसिंग मकवाना, जितेंद्र परमार, ताराचंद पवार, सुरेश दलोड यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना हवी बक्षिसी
By admin | Published: October 25, 2015 10:50 PM