नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्ह्यातील २६०० रेशन दुकानांना जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या संख्येच्या प्रमाणात दर महिन्याला शासनाकडून गहू व तांदळाचा कोटा मंजूर करण्यात येतो, त्यासाठी अन्नधान्य महामंडळाकडून धान्य उपलब्ध करून दिले जाते. मे महिन्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या धान्याच्या नियतनात तांदळाचा संपूर्ण कोटा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मनमाडला अन्नधान्य महामंडळाची वॅगन आल्यावर त्यात तांदळाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या तांदळाचा पूर्ण कोटा मिळू शकलेला नाही. त्यामुळे नाशिक शहरातील रेशन दुकानदारांना सुमारे ११ हजार क्विंटल तांदूळ कमी वाटप करण्यात आला, तर ग्रामीण भागातील दुकानांसाठी ९ हजार क्विंटल तांदूळ मिळू शकलेला नाही. शासनाच्या वतीने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला २० किलो गहू व १५ किलो तांदूळ दरमहा वाटप करण्यात येतो. पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नधान्य महामंडळाने पुरेसा तांदूळ पुरविला नसला तरी, जिल्ह्यातील बहुतांशी रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा तांदूळ मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिल्यामुळे त्याचे वाटप मे महिन्यात करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी जिल्ह्याचा व्यपगत झालेला २० हजार क्विंटल तांदूळ पूर्ववत मिळावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले जात आहेत.
२० हजार क्विंटल रेशनचा तांदूळ व्यपगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:18 AM