नाशिक : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही पाच ते सात रुपयांनी महागली असून तूर डाळीचे दर १०५ ते ११० रुपयांहून ११५ ते १२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव वाढल्याने स्वयंपाकघराचे बजेट जुळविताना गृहिणींना कसरत करावी लागते आहे.
सर्वसामान्य गृहिणींसाठी गेल्या काही वर्षांपासून तूर डाळीचे वाढणारे भाव नेहमीच चिंतेचा विषय राहिले असून आता पुन्हा तूर डाळीचे भाव वाढू लागले आहे. तूर डाळीचे दर ११५ ते १२० रुपयापर्यंत पोहोचले असून फ्लावर व टमाट्यासारख्या दैनंदिन गरजेच्या भाज्याही महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. अशा वाढत्या महागाईत मेथीसारखी पालेभाजी स्वस्त झाल्याने रोजच्या जेवणातील घटक बनल्याचे दिसून येत आहे.
--कोट---
टमाट्याच्या आवकीच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने भाव वाढत आहेत. त्याचप्रमाणे फ्लावरचेही भाव वधारले असून आता १० कंदाचे ओझे शंभर ते दीडशे रुपयांचा भाव घेत आहे. मात्र मेथीची घसरण सुरूच असून मेथील ८ ते ९ रुपयांपर्यंत घसरली आहे.
- कैलास दशपुते, व्यापारी
कोट-
टमाटा जानेवारीच्या सुरुवातीला सव्वाशे ते दीडशे रुपये जाळी विकला गेला. त्यामुळे उत्पादन खर्च निघणार की नाही, असा प्रश्न पडला होता. मात्र, आता भाव वधारले असून जाळीला अडीचशे ते तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उत्पादन खर्च निघून चार पैसे हाताला लागण्याची अपेक्षा आहे.
- रवींद्र पिंगळे, शेतकरी
कोट-
गेल्या काही दिवसांपासून तेलासह किराणा वस्तू महागल्या आहेत. यात प्रामुख्याने तूर डाळीच्या किमती सहा ते सात रुपयांनी वाढल्या असून त्याचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर होतो आहे. स्वयंपाकाचा गॅसही महागला असून स्वयंपाकघराचे बजेट जुळवताना कसरत करावी लागत आहे.
- रोहिणी जाधव, गृहिणी
इन्फो-
मेथी ८ रुपये जुडी
नाशिक बाजार समिती आवारात पालेभाज्यांच्या दरातील घसरण काही दिवसांपासून सुरूच आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी २४ रुपये जुडी असलेली मेथी गेल्या आठवड्यात नऊ ते दहा रुपयांनी घसरून १४ ते १५ रुपयांपर्यंत आली होती. त्यात आणखी घसरण झाली असून, सध्या मेथीला प्रतिजुडी ८ ते ९ रुपये दर मिळत आहे. तर टमाटा सातत्याने वाढत असून गेल्या आठवड्यात अडीचशे रुपये प्रतिक्रेट भाव आता ३०० रुपयांपर्यंत गेला आहे.
-
जुना तांदूळ ५० रुपये
सध्या तांदळचे भाव स्थिर असले तरी जुन्या तांदळाला अधिक मागणी आहे. त्यामुळेच जुना १००८ वाणाचा तांदूळ तब्बल ५० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. इंद्रायणी वाणाच्या नवीन व जुन्या तांदळाला ४७ ते ४८ रुपयांचा सारखाच भाव मिळत आहे. नवीन १००८ वाणाचा तांदूळ ४६ ते ४८ रुपयांनी विक्री होत आहे,
-
पेरू दुपटीने महागला
सुमारे महिनाभरापूर्वी ३०० ते ४०० रुपये प्रति १५ किलोने विकला जाणार फेरू या महिन्यात तब्बल दुपटीने वधारला असून आता बाजारात पेरूला ७०० ते ८०० रुपये प्रति १५ किलोचा दर मिळतो आहे. त्याचप्रमाणे द्राक्षांचेही बाजारात आगमन झाले असून, द्राक्षांना प्रतिकिलो ६० ते ७० रुपये भाव मिळतो आहे.