-----
नाश्त्याचे पैसे देण्यावरून हाणामारी
नाशिक : मेहेर सिग्नल येथे एका हातगाडीवर नाश्ता केल्यानंतर, पैसे देण्यावरून झालेल्या वादात चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. वैभव मिलिंद अहिरराव (२४) व मिलिंद अहिरराव (५५, रा. आदर्शनगर, रामवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी योगेश बाळासाहेब लोखंडे
(नांदूरगाव) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, लोखंडे हा रिक्षामधून त्याचे मित्र अमोल सोनवणे, सूरज सिंग असे आहिरराव यांच्या हातगाडीवर नाश्त्यासाठी आले होते. यावेळी पैसे अगोदर देण्यावरून वाद झाले. यात लोखंडे यांचा धक्का लागून सर्व अंडी फुटली. यातून राग आल्याने वैभव आहिरराव याने कांदा चिरायच्या चाकूने लोखंडे यांच्यासह तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. ऐन शिवजयंती दिनी मेहर सिग्नलवर गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच, सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत सर्वांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
अल्पवयीन मुलांकडून शाळेत चाकूहल्ला
नाशिक : शहरात कायदा सुव्यस्था धोक्यात येत चालली असून, शालेय विद्यार्थीही सर्रासपणे शाळेत येताना चाकूसारखे शस्त्रे बाळगू लागल्याने, संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या पेठरोड येथील अश्वमेधनगर येथील शाळेत मुलांनी धिंगाणा घालत, एकावर चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) दुपारी घडली.
या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शंकर इंगळे (४३, रा. अश्वमेघनगर) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, इंगळे यांचा मुलगा सिद्देश (१२) याने शाळेतील दोन मुलांना ‘मला का मारले,’ असे विचारल्याचा राग आल्याने, दोघा अल्पवयीन मुलांनी त्यास बेदम मारहाण करत चाकूने हल्ला करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार सिडको येथे घडला होता.
----
ट्रकच्या धडकेत काठेगल्लीत महिला ठार
नाशिक : भरधाव ट्रकने काठेगल्ली परिसरात एका दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार महिलेचा काठेगल्ली सिग्नलवर मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नूतन आनंद गायकवाड (३१, रा.नागरेचाळ, जयभवानीनगर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गायकवाड त्यांच्या विगो मोपेड दुचाकीने (एमएच १५ डीक्यु ८५५४) जात होत्या. यावेळी काठेगल्ली येथील सिग्नलवर त्यांनी सिग्नल लाल झाल्याने दुचाकी उभी केली. यावेळी त्यांच्या पाठीमागून सात पीर बाबा दर्गासमोरून भरधाव आलेल्या ट्रकने (एम.एच०४ डीडी २२१८) सिग्नलवरील वाहनाचा अंदाज न घेता, गायकवाड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे गायकवाड या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक अजीज मुस्ताक बेग (रा. सादिकनगर, वडाळा) याच्याविरुद्ध आनंद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रकचालक बेग यास अटक केली आहे.