नाशिक : रिक्षाच्या डिक्कीतून बारा हजार रुपयांची रोकड चोरणारे आरोपी सिद्धार्थ अंबादास भिसे (२२, रा. हॉटेल एक्स्प्रेस इन मागे) व रखमाजी महादेव भाग्यवंत (२६, रा. वेताळबाबा मंदिर, सातपूर) या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. पांडे यांनी शनिवारी (दि़२२) एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. २१ सप्टेंबर २०१८ रोजी पाथर्डी फाट्यावर ही घटना घडली होती़पाथर्डी फाटा परिसरातील रिक्षाचालक सुनील सोनवणे हे २१ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास आॅटो रिक्षाचा १२ हजार रुपयांचा हप्ता बँकेत भरण्यासाठी जात होते़ त्यांनी हप्त्याची रक्कम रिक्षाच्या डिक्कीत ठेवून प्रवाशांच्या प्रतीक्षेत ते पाथर्डी फाटा रिक्षा स्टॅण्डवर थांबले़ यावेळी सोनवणे यांचे लक्ष नसल्याची संधी साधून आरोपी भिसे व भाग्यवंत या दोघांनी रिक्षाची डिक्की उघडून रोकड लांबविली होती़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार के. बी. चव्हाण यांनी या चोरीचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी वकील एस़ आऱ सपकाळे यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली़ साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे या आधारे न्यायाधीश शहा यांनी आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार जी. जी. गवळी यांनी काम केले़
रिक्षातून रोकड चोरणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:34 AM