नाशिक- कोणतेही तांत्रिक ज्ञान नाही पदवी नाही परंतु सोलरवर इंधन आणि वीजेला पर्याय ठरू शकत असेल तर वाहनांना का नाही असा प्रश्न मनात आला आणि नाशिकच्या एका युवकाने सोलरवर चालणारी आॅटो रिक्षा तयार केली. एक दोन नाही तर तब्बल १९ रिक्षा तयार करून त्याने त्या विकल्या देखील आहेत.
अंकुश मागजी हे त्या युवकाचे नाव.! शिक्षण जेमतेम अकरावी पर्यंत. शाळेत असताना एकदा रिक्षेतून जाात असताना पुढिल रिक्षाच्या धुरामुळे होणारा त्रास झाल्याने त्याने पारंपरिक इंधनाला पर्याय नाही का अशी शंका उपस्थित केली. त्यानंतर वयानुरूप त्याने अनेक बाबींचा अभ्यास केला आणि त्यातून त्याने अकरावी नंतर सोलर या अपारंपरिक उर्जेचा अभ्यास केला. त्यातून त्याने प्रथम दुचाकी तयार केली. ती सोलरवर धावणे अत्यंत किफायतशीर ठरल्यानंतर त्याने रिक्षा सौलरवर चालविण्याचा प्रयत्न केला. आपल्या एका उद्योजक मित्राच्या मदतीने त्याने डाय तयार करून रिक्षांचे सोयीप्रमाणे बदल करून आकार तयार केले. त्यानंतर सोलर पॅनल बसवून रिक्षा चालवून बघितली.
बघता बघता सोलर आणि अशी उर्जा तयार होण्यात वातावरणामुळे शक्य न झाल्यास इलेक्ट्रीकवर चालविण्याची व्यवस्था केली. हा प्रयोग किफायतशीर ठरल्यानंतर त्यांनी व्यवासायिक पध्दतीने त्याची निर्मिती केली. आणि बॅटरीच्या संख्येवर आधारीत चेतक तसेच सौर मित्र अशी नावे दिली. त्याने तयार केलेल्या रिक्षा महाराष्टÑात कोणी घेतल्या नाहीत मात्र विशाखापट्टणम येथील नागरीकाने पहिली रिक्षा घेतली मग विजयवाडा,कोलकता, अहमदाबाद तसेच विशाखापट्टणम येथे त्याने अनेक मागणीनुसार रिक्षा दिल्या. अर्थात हा उद्योग करताना त्याने केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून परवाना प्राप्त केला आहे. आरटीओने देखील त्यास मान्यता दिला असून इशुरन्स शिवाय कोणत्याही प्रकारच्या अन्य नोंदणीची गरज पडत नाही. पर्यावरणपूरक असलेल्या या प्रयोगाने भविष्यातही तो उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
रिक्षावर तीनशे वॅट वीज निर्मिती होईल अशाप्रकारचे पॅनल डिझाईन करून ही रिक्षा तयार केल आहे. व्यावासायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्याला स्टार्ट अप इंडीया किंवा अन्य माध्यमातून सरकारी मदतीची अपेक्षा आहे.