संजय पाठक,
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाशिक शहरात गर्दी होऊ नये, यासाठी केंद्रे वाढविण्यात आली खरी. मात्र, लसच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अकारण पायपीट करावी लागत आहे. दोन डोसमधील ठरावीक अंतर संपूनही डोस मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यातच नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेऊन महापालिकेला उसनवारी करावी लागत असून, जिल्हा परिषदेकडून दहा हजार डोस उसने घेतल्याने मंगळवारी (दि.६) नागरिकांना डाेस देता आले.
नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यांंपासून लसींची टंचाई जाणवत आहे. २१ जूनपासून राज्यांना लस पुरविण्याची जबाबदारी केंद्र शासनाने घेतल्यानंतर, आता मुबलक डोस उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली. त्यामुळे आपापल्या भागात लसीकरण केंद्रे सुरू व्हावीत, यासाठी नगरसेवकांनी मागणी सत्र सुरू केले. नाशिक रोड येथील बिटको रूग्णालय, सिन्नर फाटा आणि खेाले मळा, सिडकेातील स्वामी समर्थ रुग्णालय आणि मेारवाडी केंद्र, अचानक चौकातील केंद्र, सातपूर येथील ईएसआयएस केंद्र आणि पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय या मोजक्याच केंद्रांवर नियमित लसीकरण होत असल्याने, या केंद्रांवर मेाठ्या प्रमाणात गर्दी असते. तिचे विकेंद्रीकरण व्हावे, म्हणून प्रशासनानेही गेल्या पंधरा दिवसांत चाळीस केंद्रे वाढविली आहेत. मात्र, २१ जूननंतर अपेक्षित लसींचा पुरवठा होत नसल्याने, नागरिकांना अकारण धावपळ करावी लागत आहे. त्यातही ज्यांना कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस उलटले आहेत आणि कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झाले आहेत. त्यांचे हाल होत आहेत. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर परिसरात डोस घेण्यासाठी सूचना येते, परंतु तेथे गेल्यावर पन्नास शंभरच डोस आल्याचे सांगून बोळवणूक केली जाते. त्यामुळे लस घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांची अडचण होते.
मंगळवारी (दि.६) केवळ ईएसआयएसआणि इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू असल्याने दोन्ही केंद्रांवर गर्दी हेाती. मात्र, कोविशिल्ड नसल्याने अनेक जणांना परत जावे लागले.
इन्फो...
महापालिकेला २१ ते ३० जूनदरम्यान ३५ हजार ५४० डोस मिळाले होते. त्यात दोन हजार डोस जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून उसने घेण्यात आले हेाते. २ जुलैस जि्ल्ह्याला ५४ हजार डोस मिळाले. त्यातील १,१८० डोस मिळाले हेाते. त्यानंतर, सोमवारी (दि.५) जिल्हा परिषदेकडून महापालिकेने कोव्हॅक्सिनचे डोस उसने घेतले आणि त्यामुळे बुधवारी लसीकरण होऊ शकले.
कोट..
मोजक्याच केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी होऊ नये, यासाठी महापालिकेने केंद्रे वाढवली आहेत. नागरिकांनाही घराजवळ लस मिळाली, तर दूरवर जाण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने नियोजन केले आहे. मात्र, लसींचा पुरवठा होईल. त्यानुसार, सर्व केंद्रांना लस पुरवली जाते.
- डॉ.बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.
इन्फो..
१३०००००
नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट
४,७६,७९३
आत्तापर्यंतचे एकूण डोस
३,६४,६५४
नागरिकांना पहिला डोस
१,१२,१३९
नागरिकांना दुसरा डोस
--------------
छायाचित्र दोन आहेत. १) आर फोटेावर ०६ इएसआयएस २) इंदिरा गांधी रुग्णालय (डेस्कॅनवर नीलेश तांबे)