नाशिक : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या ‘रिले’ या नाटकाने बाजी मारली आहे. नाशिक केंद्रात या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर अहमदनगर शेवगावच्या भारदे हायस्कूलने सादर केलेल्या ‘तुझ्या जागी मी असते तर’ या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला.काही दिवसांपूर्वी शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ‘रिले’ या नाटकासाठी धनंजय वाबळे यांना, तर द्वितीय पारितोषिक ‘प्रोजेक्ट मैत्रबंध’ नाटकाकरिता उर्मिला लोटके यांना जाहीर झाले. प्रकाश योजनेसाठीचे प्रथम पारितोषिक ‘सेल’ नाटकासाठी चैतन्य गायधनी यांना, तर द्वितीय पारितोषिक ‘पाझर’ नाटकासाठी मनोज पाटील यांना जाहीर करण्यात आले. नेपथ्यासाठीचे प्रथम पारितोषिक ‘देवाचे दान’ नाटकासाठी कार्तिकेय प्रतीक यांना तर द्वितीय पारितोषिक ‘तुझ्या जागी मी असते तर’ या नाटकासाठी नीलेश विधाते यांना जाहीर झाले आहे. रंगभूषेसाठी असलेले प्रथम पारितोषिक ‘च्या बही’ या नाटकासाठी अश्विनी भलकार यांना, तर द्वितीय पारितोषिक ‘प्रोजेक्ट मैत्रीबंध’ नाटकासाठी सोनाली दरेकर यांना जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले रौप्यपदक ‘वासुदेव आला रे’ या नाटकासाठी प्रथमेश राजपूत यांना व ‘देवाचं दान’ नाटकासाठी सृष्टी पंडित यांना जाहीर झाले आहे. १५ ते २५ जानेवारी या कालावधीत भय्यासाहेब गंधे नाट्यगृह, जळगाव व परशुराम साईखेडकर नाट्यगृह नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत ५३ नाटके सादर झाली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जुई बर्वे, स्वाती वेदक, प्रमोद काकडे यांनी काम पाहिले.यांचा अभिनय ठरला गुणवत्तापूर्णखुशी पाटील (अभिष्टा), कृतिका मुळे ( झपाटलेली चाळ), साक्षी बारी (पोपट आणि आम्ही), श्रद्धा पाटील (कुसू आणि तात्या), युगा कुलकर्णी (थेंबाचं टपाल), पंकज पाटील (मु.पो. कळमसारा), चैतन्य चंदनशे (एलियन्स द ग्रेट), इशान कुलकर्णी (वॉटर भि.शी.), शुभम कापरे (हुतात्मा), ऋषिकेशा मांडे (माँ) यांना अभिनयासाठी असलेले गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. या बाल कलावंतांच्या दर्जेदार अभिनयाने परीक्षकांची मने जिंकली.
बालनाट्य स्पर्धेत ‘रिले’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:18 AM