नाशिक : सेना-भाजप युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते जाहीर कार्यक्रमांमधून ठामपणे भूमिका मांडत असले तरी अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने युतीची अनिश्चितता अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील एक किंवा दोन जागांच्या अदलाबदलीसाठी अनुकूल असल्याची चर्चा असतानाच आता रिपाइंकडून जिल्ह्यातील तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या रिपाइंच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंला लोकसभा निवडणुकीत एकही जागा देण्यात आली नसली तर नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मंत्रिपद तसेच राज्यात रिपाइंला अविनाश महातोकर यांच्या रूपाने एक मंत्रिपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत रिपाइंला किमान दहा जागा सोडण्याबाबतचा आग्रह आठवले यांनी धरला आहे. मात्र याबाबत अद्याप भाजपाकडून कोणताही शब्द देण्यात आलेला नाही. मात्र रिपाइंने यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत बैठक बोलाविली होती. यावेळी रिपाइंने नाशिकमधील किमान चार जागांवर निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.रिपाइंच्या या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी देवळाली, नाशिक पश्चिम आणि नांदगाव या तीन जागांची मागणी केल्याचे समजते. सेना आणि भाजप यांनी आपापल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी दर्शवावी, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत करण्यात आल्याची चर्चा यावेळी झाली. दरम्यान, नांदगाव तसेच नाशिक पश्चिम जागेसंदर्भात सेना-भाजपा यांनी यापूर्वीच दावा सांगितल्यामुळे रिपाइंला जागावाटपाच्या चर्चेत कितपत गांभीर्याने घेतले जाईल, याविषयीच शंका आहे. युती संदर्भातील चर्चेनंतरच घटक पक्षांना किती आणि कुणाच्या कोट्यातून जागा द्यायच्या याबाबतची चर्चा होणार आहे.त्यामुळे रिपाइंकडून प्राथमिक स्तरावर चाचपणी करण्यात आली असली रिपाइंच्या वाट्याला जिल्ह्यातील जागा येणार की नाही हा खरा प्रश्न आहे.
रिपाइं तीन जागांसाठी आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:42 AM