नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी मध्यरात्रीपासून जोरदार संततधार सुरू आहे. यामुळे गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील चांगला पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळी ११ वाजेपासून गोदावरीच्या पात्रात पाच हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. नाशिककरांचे पारंपरिक पुरमापक असलेली गोदावरीच्या पात्रातील दुतोंड्या मारुतीची मुर्ती कमरेपर्यंत पाण्यात बुडाली आहे.
नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याकडून बुधवार व गुरुवारी (दि.१६) ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. यानुसार जोरदार पाऊस नाशिकच्या इगतपुरीसह अन्य तालुक्यांमध्ये सुरु आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही जोरदार पाऊस मध्यरात्रीपासून सुरू होता. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये २८, गौतमी धरण परिसरात २५, आंबोलीमध्ये ३१, काश्यपी धरण परिसरात १२ तर गंगापुर धरण परिसरात ९ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे खात्याकडून करण्यात आली.
सकाळपासून गंगापुर धरणात पाणलोटक्षेत्रातून पुर पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणातून ५,११७ क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दुपारी चार वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीवरील शहरातील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात ६ हजार २९८ क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह मोजण्यात आला. इगतपुरी तालुक्यातदेखील मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे दारणा धरणातून ४ हजार ३१६ क्युसेकचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कडवा धरणातूनदेखील २हजार ४९९ क्युसेकचा विसर्ग नदीत सोडला जात आहे.
नाशिक शहरातदेखील पावसाच्या हलक्या व मध्यम सरींचा दिवसभर वर्षाव सुरु राहिला. काही वेळ विश्रांती घेत पावसाच्या सरींचे आगमन होतच राहिल्याने रस्ते ओलेचिंब झाले. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले पहावयास मिळाले. यामुळे दिवसभर नाशिककरांना रेनकोट, छत्रीचा आधार घ्यावा लागला. रात्री अकरा वाजेनंतर शहरात सोसाटयाचा वारा सुटला व मध्यम सरींचा वर्षाव झाला. पहाटेही पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ७.८मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा-
गंगापूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढविला जाऊ शकतो, असे पाटबंधारे खात्याने कळविले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गोदाकाठलगतचे रहिवाशी, व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अग्निशमन दल, जीवरक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून गाेदाकाठ परिसरात गस्त केली जात आहे.