पेठ : (रामदास शिंदे )‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ यासारख्या घोषणा कितीही कागदावर आणि पोस्टरवर झळकवल्या तरी आजही समाजात मुलीच्या जन्माबद्दल आणि तिच्या गर्भातील हत्येबद्दल पुढारलेल्या आपल्याच राज्यात फारसा फरक पडलेला नाही. तरीही आधुनिकतेपासून अजूनही कोसोदूर असलेल्या दुर्गम पेठ तालुक्याने मात्र याच लेकीच्या जन्माचे संरक्षण करून नाशिक जिल्ह्यात मुलीच्या जन्मदराचा आलेख वाढता ठेवला आहे. पेठ हा तसा दुर्गम तालुका समजला जातो. भलेही विकासाच्या गंगा येथे वाहत नसतील, मात्र स्त्रीभ्रूण हत्येसारख्या वाईट मनोवृत्तीपासून येथील नागरिक दूर राहिला आहे. आदिवासी तालुक्यातील मागील ५ वर्षांचा मुलींच्या जन्मदराचे गुणोत्तर बघितले असता वंशाचा दिवा हवाच म्हणून मुलीच्या गर्भाची हत्या करून तिला गर्भातच ठार मारणाऱ्या मनोवृत्तीला ही सणसणीत चपराक आहे.वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना केवळ मुलगाच पाहिजे या हट्टापाई अनेक कोवळ्या कळ्याही जन्मापूर्वीच खुडल्या जात असल्याचे विदारक दृश्य पहावयास मिळते. आदिवासी भागात मुलं ही देवाघरची देणगी मानली जाते.आजही मुलांच्या बरोबरीने मुलीवरही तेवढेच प्रेम करणाºया या भागातील शाळांच्या पटसंख्येतही मुलांपेक्षा मुलींची संख्याही अधिक दिसून येते.मागील पाच वर्षांचा पेठ तालुक्यातील जन्मगुणोत्तराचा विचार केला तर जवळपास बरोबरीने गुणोत्तर असून, नाशिक जिल्ह्यात पेठ तालुका अव्वल ठरला आहे.---------------पेठ तालुक्यात आरोग्य विभागामार्फत गावस्तरावर मुलींच्या जन्माबाबत यंत्रणेकडून वारंवार मार्गदर्शन करण्यात येत असून, कोणत्याही प्रकारच्या लिंगनिदान चाचण्या न करता मुलगा-मुलगी एक समान या नात्याने मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येत असतो.-डॉ. मोतीलाल पाटीलतालुका वैद्यकीय अधिकारी, पेठ
आदिवासी मुलींचा वाढता जन्मदर दिलासादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 9:48 PM