नाशिक : पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे. पितृपक्ष सुरू झाल्यावर पूर्वज पृथ्वीवर येतात तर सर्वपित्री अमावास्येला त्यांना निरोप दिला जातो, अशी धारणा असल्याने या दिवसाला महत्त्व आहे. ज्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही, त्यांचे श्राद्ध, पक्ष सर्वपित्री अमावास्येला केले जाते. बुधवारी (दि.१०) नवरात्रास प्रारंभ होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.९) श्राद्ध, पक्ष, तर्पण, दानधर्म आदी करून आपल्या पितरांच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत. या दिवशी महालयदेखील आहे. या दिवशी पवित्र अशा नद्यांमध्ये स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण केले जाते. नातेवाईक, ब्राह्मण आदींना बोलावून भोजन दिले जाते. याशिवाय गोरगरिबांना अन्न, वस्त्र दान करण्यालाही महत्त्व आहे. यामुळे पित्रांचे आत्मे तृप्त होतात, असे मानले जाते.गंगाघाटावर गर्दीनाशिककरांकडून मंगळवारी श्राद्ध, तर्पण, पक्ष, पिंडदान, नैवेद्य, भोजन, दानधर्म, सामाजिक उपक्रमांद्वारे पितरांचे स्मरण करण्यावर भर दिला जाणार आहे. गंगाघाटावरही पितृपक्षाची गर्दी होणार असून, त्यानुसार प्रशासनाने नियोजन केले आहे.
पितरांच्या स्मरणार्थ विधी ; आज अमावास्या समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:44 AM