मालेगाव : दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या मोसम खोऱ्यातील नागरिकांना नद्यांना आलेल्या पुरामुळे दिलासा मिळाला आहे. परिसरातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मोसम नदीसह, लोंढा, वाटोळी, कुमाऱ्या, पाझर नाल्यांना पूरपाणी गेल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच मोसम नदीपात्रात पूरस्थिती झाल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने पुराचा धोका निर्माण झाला होता. नदीकाठावरील रहिवाशांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. पुलावर गर्दी केलेल्या नागरिकांना सुरिक्षत स्थळी जाण्याचे आदेश ग्रामपंचायतमार्फत देण्यात आले होते. रात्री झालेल्या पावसाने परिसराला चांगलेच झोडपून काढले असून, खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सकाळपासूनच संततधार सुरू होती. दरम्यान, पाण्याची परिस्थिती पाहता शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
मालेगाव परिसरातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
By admin | Published: August 04, 2016 12:50 AM