नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टपोरी मुले मुलींना त्रास देत असतात. अशाच तक्रारींची दखल घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) सारडा शाळेजवळ उभे राहून तेथील रोडरोमियोंना चोप दिला.
हिंगणघाट येथील अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेविषयी चर्चा सुरू आहे. मात्र, तत्कालीक घटनेनंतर यंत्रणा सतर्क होतात आणि नंतर मात्र विषय मागे पडतो. शहरातील महाविद्यालयेच नव्हे तर शाळांच्या परिसरातदेखील रोडरोमियो धुडगूस घालत आहेत, परंतु त्यांच्यावर नियंत्रण आणणे पोलीस यंत्रणेलादेखील शक्य झालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सारडा सर्कल येथे टवाळखोर मुले त्रास देत असल्याची एक तक्रार आल्यानंतर मनसेचे मनोज घोडके, निखिल सरपोतदार, राजू पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सारडा कन्या विद्यालयाजवळ ठाण मांडले आणि मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पिटाळले. काहींना तर चोपही दिला. यानंतरही शाळेच्या परिसरात अशाच प्रकारे टवाळखोरांना धडा शिकवला जाईल, असे मनोज घोडके यांनी सांगितले.
या प्रकारानंतर रोडरोमियोंनी पळ काढला असला तरी सध्याचे वातावरण बघता सर्वच सार्वजनिक ठिकाणी मुलींची होणारी छेडछाड आणि अन्य प्रकार बघता पोलिसांची किमान बीट मार्शल्सची गस्त शाळांच्या परिसरात वाढविण्याची मागणी होत आहे.