रविवारी जनतेचा कर्फ्यू यशस्वी करून जनता आता शिस्तप्रिय झाल्याचे चित्र बघावयास मिळाले होते. परंतु सोमवारी सकाळी लॉकडाऊन असतांनाही नागरिकांनी घरातून बाहेर पडत आपले दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू केले. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांनी घरातच थांबावे असे प्रशासनाकडून आवाहनही करण्यात आले, परंतु अनेक बेफिकीर नागरिकांनी ही सुचना गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून आले. काही नागरिक कारण नसताना दुचाकीने रस्त्यावर फेरफटका मारत होते, तसेच बंद दुकानांसमोर अथवा चौकात टोळक्याने उभे राहून गप्पा मारताना दिसत होते. वारंवार आवाहन करूनही त्यांनी दाद न दिल्यामुळे अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. पाच कंदील चौकात मास्कचा वापर न करणा-या व विनाकारण भटकणाºया नागरिकांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला. त्यामुळे गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. शहरातील किराणा दुकान, पेट्रोल पंप, मेडीकल, दूध, तसेच भाजीपाला आदीची दुकाने त्यांना निर्धारीत करून दिलेल्या वेळेत सुरू होती. नागरिकांनाही आता कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात येऊ लागले असून दिवसभर घरातच थांबण्याची सवय अंगवळणी पडू लागली आहे. या काळात सोशल मिडीयाचा वापर मात्र खूपच वाढला असून त्यावरून परस्परांशी संपर्क साधला जात आहे.
देवळ्यात संचारबंदीमुळे रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 4:59 PM