नाशिकरोड : स्वतंत्र वाहतूक शाखा विभाग करूनही नाशिकरोड परिसरांतील हमरस्ते व मुख्य चौकांत बेशिस्त वाहनपार्किंगमुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी कागदपत्रे तपासणे, हेल्मेट आदींची दंडात्मक कारवाई करण्यावर भर दिला जात असल्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नाशिक शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल होत चालली आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे स्वतंत्र विभाग करण्यात आले आहे. नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार वाहतूक शाखा विभाग-४ स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व ५० वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईवर भरनियमानुसार, शिस्तबद्ध वाहतुकीसाठी प्रबोधन करून जनतेत मिसळून काम करणे गरजेचे आहे. तसेच बेशिस्तपणे व वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने पार्किंग करणाºयांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यापेक्षा कागदपत्रे तपासणे, हेल्मेट न वापरणे या कारवाईवरच जास्त भर दिला जात आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईबद्दल नाराजी पसरली आहे.बिटको चौकाच्या चहुबाजूला दुकानासमोर वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. रेजिमेंटल प्लाझा ते बिटको चौक, पवन हॉटेल ते नाशिकरोड पोलीस ठाणे, मिस्त्री वाइन ते बिटको चौक, देवळाली कॅम्प रिक्षाथांबा, शिवाजी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गायकवाड मळा रस्ता, जामा मस्जिदरोड या भागांत सकाळपासून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात होते. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे तर ठिकठिकाणी वाहतुकीचा गोंधळ होत असतो. शिवाजी पुतळ्यासमोर उड्डाण पुलाखालून नवले कॉलनीत जाणारा रस्ता रिक्षा, टॅक्सी उभ्या राहत असल्याने बंद झाला आहे. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांना जुन्या पुलाकडून असलेल्या रस्त्याने जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. तेथील वाहनधारकांना वाहन बाजूला घेण्यास सांगितले तर ते उर्मट व दादागिरीची भाषा करतात, अशी रहिवाशांची ओरड आहे. वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी बेशिस्त वाहनधारक व प्रवासी वाहतूक करणाºया काही मुजोरपणे वागणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्याची खरी गरज आहे. जेलरोडला शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्या वेळेला फिरत्या वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणेदेखील गरजेचे आहे. हॉटेल, दुकाने, ट्रॅव्हल्स कार्यालय, बॅँका यांच्याबाहेर वाहन पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच वाहने वेडीवाकडी उभी केली जातात. त्या ठिकाणी वाहने उभी करण्याचे नियोजन केल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होईल.
नाशिकरोडला वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:39 AM