सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणारा मुख्य म्हैसवळण घाट रस्ता खचून या दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला दोनशे ते तीनशे अदिवासींची लोकवस्ती असलेल्या चौरेवाडी येथील ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे.याच परिसरातील भरविर-निनावी हा रस्ताही खचून पूर्णपणे पाण्यात वाहून गेला आहे, रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या भात लागवड केलेल्या जमिनी वाहून गेल्या आहेत. परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या शेतातील बांध तुटले, अनेकांच्या विहिरी बुजल्या तसेच शेतीवरील वीज मिटरमध्ये पाणी जाऊन यंत्रणा बंद पडली आहे. भातशेतीची वाताहत झालेली असतांना देखील या परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे स्थानिक प्रशासनाकडून अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. या सर्व परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी नुकतीच केली व शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचेसह खेड गटाचे गटनेते महेश गाढवे,अडसरे येथील सरपंच संतु साबळे,सरपंच परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ.श्रीराम लहामटे,सामाजिक कार्यकर्ते सुनील महाले, तुषार शिंदे, केशव बांबळे, दिलीप बांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हैसवळण घाटातील रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 4:41 PM
धोकादायक : दोन जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला
ठळक मुद्देखचलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला दोनशे ते तीनशे अदिवासींची लोकवस्ती असलेल्या चौरेवाडी येथील ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे.