सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात चारा-पाणीटंचाई जाणवू लागल्याने जिवापाड जपवणूक केलेल्या लाखमोलाच्या पशुधनाला नाइलाजास्तव बाजाराचा रस्ता दाखविण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.पाण्याची कुठलीही शास्वत सुविधा या भागात नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायने मागील पाच-सहा वर्षांत चांगलेच बाळसे धरले आहे. उत्पादनाचे साधन म्हणून प्रत्येक घरासमोर दोन ते तीन दुभती जनावरे पहावयास मिळाल्यास नवल नाही. शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, तचेस मजुरीवर होणारा खर्च याचा सारासार विचार केल्यास शेतकरी वर्गाला हातात किती पैसे मिळणार याचा विचार न केलेलाच बरा. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय या भागात फोफावला असला तरी, पाणी तसेच चाराटंचाईने या व्यवसायालाही उतरती कळा लागली आहे. दुधाचे बाजूलाच मात्र पशुधन वाचवण्यासाठी मोठी धडपड करणे भाग पडत आहे. चाराच संपुष्टात आल्याने ओला तसेच सुका चाऱ्याच्या किमतीत चारपट वाढ झाली आहे. ज्वारीच्या कडब्याच्या शंभर पेंढ्यांना चार हजार रुपये तसेच उसाच्या एक ा मोळीला पन्नास रुपये द्यावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे खासगी टॅँकरचालकांची चलती असल्याने दोनशे लिटर पिंपाला दीडशे रुपये मोजावे लागतात.पूर्व भागातील मलढोण, पिंपरवाडी, कहांडळवाडी, भोकणी, खंबाळे, वावी, मिठसागरे, सायाळे, मीरगाव फत्तेपूर, सुरेगाव या ठिकाणी सिंचन सुविधा नसल्याने भीषण दुष्काळ आहे. रस्त्याच्या कडेला टॅँकरच्या प्रतीक्षेत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिंपावरून गावात दुष्काळी स्थितीचा अंदाज येतो. पिण्यास मुबलक पाणी नाही तर जनावरांना चारा कोठून आणायचा, अशी स्थिती या भागात असल्याने पशुधन विक्रीचे प्रमाण वाढले आहे. लाखमोलाच्या पशुधनाला ग्राहकच नसल्याने दलाल याचा फायदा उठवत कवडीमोल खरेदी केलेली जनावरे कसायाच्या दावणीला जात असल्याचे चित्र तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडे बाजारात पहावयास मिळत आहे. शासनाने सिन्नरच्या पूर्व भागात निदान पाऊस पडेपर्यंत चारा छावणी सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.
सिन्नरमध्ये पशुधनाला बाजाराचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:57 PM